बंद

जिल्ह्याविषयी

भंडारा हा ‘भनारा’ या शब्दाचा अपभ्रंश असावा कारण रतनपूर येथील उत्खनात इ.स.११०० मध्ये मिळालेला शिल्पलेखात ‘भनारा’ असा शब्दप्रयोग आढळतो. भंडारा जिल्हा हा वैनगंगेच्या खोऱ्यात उत्तर अक्षांश २१.१७° आणि पूर्व रेखांश ७९.६५° च्या दरम्यान वसलेला आहे. भंडारा जिल्ह्याचा उत्तरेस मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्हा, पूर्वेस गोंदिया जिल्हा, दक्षिणेस चंद्रपूर जिल्हा व पश्चिमेस नागपूर जिल्हा आहे. या जिल्ह्यात दर हजार पुरुषामागे स्त्रियांची संख्या ९८२ आहे. हेच प्रमाण ग्रामीण भागात ९८३ व शहरी भागात ९८१ आहे. तुमसर, लाखांदूर तालुक्यात हे प्रमाण सर्वात जास्त ९९२ तर मोहाडी, लाखनी तालुक्यात सर्वात कमी ९७४ इतके आहे. या जिल्ह्यात ८३.८% लोक साक्षर आहेत. त्यापैकी पुरुष व स्त्रियांची टक्केवारी अनुक्रमे ९०.४ % व ७७.१ % इतकी आहे. नागरी भागात ९०.७ % व ग्रामीण भागात ८२.१ % साक्षरता दिसून येते. जिल्ह्यात धर्मानुसार हिंदू ८४.१%, बौद्ध १२.९%. मुस्लिम २.२%, खिश्चन ०.२%, जैन ०.१%, शीख ०.१%, इतर ०.३% आणि धर्म निर्देशित न केलेली लोकसंख्या ०.२% आहे. वैनगंगा ही जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे. या नदीचा जिल्ह्यातील प्रवाह उन्हाळ्यातसुद्धा कोरडा पडत नाही. या जिल्ह्यात बावनथडी, चूलबंद, कन्हान, बाघ ही धरणे आहेत. जिल्ह्यात भंडारा, तुमसर आणि साकोली असे 3 उपविभाग आहेत. भंडारा उपविभागात 2 तालुके असून , तुमसर उपविभागात 2 तालुके असून ,साकोली उपविभागात 3 तालुके असून 878 गावे आहेत.