सेवा पंधरवडा अभियान
प्रेस नोट
राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा-17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर या कालावधीत विशेष मोहीम
सर्व नागरीकांना याद्वारे सूचित करण्यात येते की, महसूल व वन विभाग शासन निर्णय क्र. मराअ-2025/प्र.क्र.63(ई ऑफीस क्र. 1296378) समन्वय-1 दिनांक 01 सप्टेंबर, 2025 अन्वये, महसुल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक करण्याचे दृष्टीकोनातून भारताचे पंतप्रधान राष्ट्रनेता मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांचा आगामी जन्मदिन दिनांक 17 सप्टेंबर 2025 ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दिनांक 02 ऑक्टोंबर 2025 या कालावधीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत “सेवा पंधरवाडा ” राबविण्याकरिता दिनांक 01 सप्टेंबर रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
हे अभियान “पाणंद रस्ते विषयक मोहिम”, “सर्वांसाठी घरे” या उपक्रमासाठी पुरक उपक्रम आणि “जिल्हाधिकाऱ्यांमार्फत नाविन्यपुर्ण उपक्रम” अशा तीन टप्प्यांमध्ये राबविण्यात येणार आहे.
सेवा पंधरवाडा अभियानाच्या पहिल्या टप्प्यामध्ये 17 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर या कालावधीमध्ये शिव/ पाणंद रस्त्यांचे सर्वेक्षण करणे, ज्या रस्त्यांची नोंद निस्तार पत्रक, वाजिब उल अर्जामध्ये करण्यात आलेली नाही त्याची नोंद घेण्याबाबत कार्यवाही करणे, शेतावर जाण्यासाठी रस्ते उपलब्ध करुन देण्यासाठी संमतीपत्र घेणे, रस्ता अदालत आयोजित करुन शेतरस्त्यांचे प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे, शेतरस्त्यांची मोजणी व सिमांकन करणे आदी कामे करण्यात येणार आहेत.
अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये दिनांक 23 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर या कालावधीमध्ये “सर्वांसाठी घरे” या उपक्रमाअंतर्गत घरे बांधण्यासाठी निर्बाध्यरित्या वाटपास उपलब्ध असलेली शासकीय जमीन कब्जेहक्काने प्रदान करणे, सदर उपक्रमासाठी रहिवासी प्रयोजनासाठी असलेली शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमातील तरतुदीनुसार नियमानुकूल करणे, सर्वांसाठी घरे या योजनेअंतर्गत शासकीय जमीन वाटप केलेल्या तसेच अतिक्रमण नियमानुकूल केलेल्या लाभार्थ्यांना पट्टे वाटप करणे आदी कामे करण्यात येणार आहेत.
अभियानाच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये दिनांक 28 सप्टेंबर ते 02 ऑक्टोंबर या कालावधीमध्ये भंडारा जिल्ह्याकरीता “लक्ष्मी मुक्ती योजना” राबविण्यात येणार असून सदर योजनेअंतर्गत शासन परिपत्रक दिनांक 15/09/1992 नुसार एखाद्या व्यक्तीने आपल्या स्वत:च्या जमिनीत आपल्या कायदेशीर पत्नीच्या नावाचा 7/12 च्या उताऱ्यात स्वत:बरोबर सहहिस्सेदार म्हणून नोंद घेणेसाठी स्वेच्छेने अर्ज केल्यास महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील कलमांनूसार फेरफार नोंदीची प्रक्रिया पुर्ण करण्यात येणार आहे. तसेच अभियानाच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये भंडारा जिल्ह्यात “अन्नसुरक्षा कायदा 2013 नुसार अंत्योदय तसेच प्राधान्य कुटुंब लाभ योजनेतील दिव्यांग लाभार्थी यांना घरपोच धान्य वितरण करण्यात येणार आहे.
सदर अभियान यशस्वी करण्यासाठी यंत्रणेतील प्रत्येक घटक प्रयत्नशील राहणार असून भंडारा जिल्ह्यातील नागरिकांनी या अभियानाचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानातंर्गत “सेवा पंधरवडा” (भारताचे पंतप्रधान राष्ट्रनेता मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांचा जन्मदिन दि. 17 सप्टेंबर ते राष्टपिता महात्मा गांधी यांची जयंती 2 ऑक्टोंबर)
अ.क्र | दिनांक | मोहिम |
---|---|---|
1 | 17 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर | पाणंद रस्तेविषयक मोहिम |
2 | 23 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर | “सर्वांसाठी घरे” रहिवासी प्रयोजनार्थ अतिक्रमण नियमानुकूल करणे व पट्टेवाटप मोहिम |
3 | 28 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर | लक्ष्मी मुक्ती योजना व दिव्यांग लाभार्थ्यांना घरपोच रेशन धान्य वितरण |